नुकतंच रंगनाथ पठारे यांचं ताम्रपट हे पुस्तक वाचलं. ८०७ पृष्ठांचं हे पुस्तक मजेस्टीक प्रकाशन, गिरगाव मुंबईने, २००९ साली ह्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. १९४० ते १९८० या कालखंडातील राजकीय प्रवास उलगडून दाखविणारी ही कादंबरी आहे.
- नाना सिरूर, सहकारी चळवळीचे प्रणेते
- दादासाहेब भोईटे, उद्योजक, कारखानदार
- बापूसाहेब देशमुख, राजकारणी
आजच्या सामाजिक जीवनातील तीन विचारधारेंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या तीन व्यक्तीरेखा आहेत. नाना सिरूर ही ह्या कादंबरीची केंद्रीय व्यक्तीरेखा असली तरी तीनही व्यक्तीरेखा छान साकारल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यलढयाच्या वेळी एका पृष्ठभूमीवर वावरणाऱ्या ह्या तीन व्यक्तीरेखांचा स्वातंत्र्यानंतर आपापल्या निवडीच्या दिशेने झालेला जीवनप्रवास आणि त्या अनुषंगाने त्यांच्या विचारधारेत झालेले बदल हे लेखकाने उत्तम रीतीने वाचकांसमोर ठेवले आहे. नाना सिरूरांचे एकच व्यक्तित्व आहे जे कधीच आपल्या विचारधारेपासून ढळले नाही, आपल्या आदर्शांशी कधीच तडजोड मान्य केली नाही. त्या व्यक्तीरेखेसाठी एक आदरभाव वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालानुरूप बदल मान्य न केल्यामुळे त्यांची कमी होत गेलेली लोकप्रियता व सामाजिक कार्यक्षेत्र हे पण छान जमून आलंय. उलट दादासाहेब आणि बापूसाहेब ह्यांनी विचारधारांना लवचिक ठेवून, प्रसंगी नितीमत्ता धाब्यावर बसवून कशी वैयक्तिक प्रगती साधली हा विरोधाभास उत्तमरीत्या मांडण्यात आला आहे.
कथानकात ह्या तीन व्यक्तीरेखांच्या अवतीभवती वावरणाऱ्या काही छोट्या व्यक्तीरेखा सुद्धा जमून आल्यात. जसा नानासाहेबांचा उजवा हात निस्सार मोमीन. बापूसाहेबांच्या सौभाग्यवती इंदिरा राजे आणि सहायक काशीनाथ ढोरमले जो पुढे दादासाहेबांचा उजवा हात बनून समोर येतो.
लेखकाचे विशेष कौशल्य जाणवते जिथे काही खऱ्या घटना आणि पात्रांसोबत कादंबरीतील पात्रांचे कथानक विणले आहे तिथे. यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपासून थेट इंदिरा गांधी सुद्धा ह्या कादंबरीत डोकावून जातात. बापूसाहेबांचा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून घडवून आणल्या गेलेला कॉंग्रेस पक्ष प्रवेश ही अशीच एक नाट्यमय घटना.
पुस्तकाची विभागणी छोट्या छोट्या प्रकरणामधे केलेली असल्यामुळे वाचकाला विश्रांतीसाठी सोईचं ठरतं. ही एक विशाल कादंबरी असल्यामुळे राजकीय क्षेत्राची आवड नसल्यास ह्या पुस्तकाच्या वाटेला जाऊ नये ही सुचना वाचकांसाठी आहे.