विशेष पोस्ट

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

म्हणी आणि वाक्प्रचार वापरून आपण आपले विचार प्रभावी पणे मांडु शकतो, अर्थात समोरच्याला सुद्धा त्यांचे अर्थ माहित असतील तर . त्यामुळे ह्या म्हण...

गुरुवार, १६ मार्च, २०१७

इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द

आज आपण मराठीची हि अवस्था करून ठेवली आहे कि आपल्याला इंग्रजी-मराठी शब्दकोशाची आवश्यकता पुन्हा नव्याने भासायला लागली आहे, इंग्रजी शिकण्याकरीता नव्हे तर मराठी शिकण्याकरीता. मराठी बोलतांना आपल्याला इंग्रजी शब्द वाक्यात घुसडुन पटापट बोलता येता पण सर्व मराठी शब्द वापरायचे म्हटले तर मात्र कठीण होऊन जातं. अगदी साध्या साध्या शब्दासाठी आपल्याला स्मरणशक्तीवर ताण द्यावा लागतो. अर्थार्जनासाठी तुम्ही इंग्रजी स्वीकारा, हवा असेल तेवढा कामाच्या ठिकाणी तिचा वापर करा, पण कामाचे काही तास सोडल्यास दैनंदिन जीवनात मराठीचा वापर न होणे हे दुखद आहे. मुलांनी शाळेत इंग्रजी शिकावी. आपण घरी त्यांचा सराव करून घ्यावा. पण इंग्रजीचा अनावश्यक वापर टाळण्याचा प्रयत्न आपण करू इच्छित नाही. दुरचित्रवाणी द्वारे मुलांवर होणारा हिंदी आणि इंग्रजीचा भडीमार हा पण या भाषा प्रदुषणात एक मोठी भुमिका बजावत आहे. आज मुलांना Ad ला मराठीत जाहिरात म्हणतात. Serial ला मालिका म्हणतात. Channel ला वाहिनी म्हणतात इतके साधे साधे शब्द माहित नाहीत.

आज मुलांना घरात मराठीची थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. पण जिथे पालकच संकरित मराठी बोलत सुटतात तिथे मुलांना कितपत दोष द्यावा. आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठुन. पण जर प्रामाणिक इच्छा असेल तर याला आळा घालणे सहज शक्य आहे. तेंव्हा जर का आपल्या मायबोलीचे पाईक व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वांनी यावर मेहनत घेणे आता अपरिहार्य आहे . चला सुरुवात करुया.


आजचे शब्द:
एक एक शब्द घ्यायला वेळ लागेल म्हणुन मग एकमेकाशी संबंधित काही शब्द आपण सोबत बघत जाऊ.

Engineer               =  अभियांत्रिक/अभियंता
Engineering         =  अभियांत्रिकी
Medicine              =  औषधी
Medical Store      =  औषधाचे दुकान\औषधालय
Bucket                  =  बादली


आतापर्यंत आपण खालील शब्द शिकलो:


Bio-technology      =   जैवतंत्रज्ञान
Biological              =   जैविक/जैवशास्त्रीय
Bacteria                 =   जीवाणु
Virus                      =   विषाणु
Antibiotic              =   प्रतिजैविक

Bench =  बाकडं
वाक्यात उपयोग: बगीच्यात बाकडयावर बसायला आज काल जागाच मिळेनासी झाली आहे.

Television set  =  दूरचित्रवाणी संच
वाक्यात उपयोग: दूरचित्रवाणीने मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांती घडविली.

Problem = अडचण \ समस्या \ प्रश्न \ पेच \ त्रास
वाक्यात उपयोग: माझी एक अडचण दूर करशील का?

Internet  = आंतरजाल\आंतर्जाल
वाक्यात उपयोग: आंतरजाल हे ज्ञानाचं अफाट भांडार आहे.

Light = दिवा \ उजेड \ प्रकाश \ हलका \सौम्य
वाक्यात उपयोग: तो दिवा लाव \ आज मी थोडं हलकंच जेवणार आहे

Wife = पत्नी\बायको
वाक्यात उपयोग: हि माझी पत्नी \ हि माझी बायको.

Mister = पती\नवरा
वाक्यात उपयोग: हे माझे पती \ हा माझा नवरा.

Contractor = कंत्राटदार
वाक्यात उपयोग: कंत्राटदारांच्या कामावर पालिकेचं काहीच नियंत्रण नसतं

Bottle = बाटली
वाक्यात उपयोग: आज माझ्याकडुन दुधाची बाटली फुटली.

To get bored  = कंटाळा येणे, वीट येणे
वाक्यात उपयोग: बसुन बसून मला कंटाळा आला.

Table = मेज
वाक्यात उपयोग: पुस्तक त्या मेजावर ठेव.

Plan  = योजना, बेत
वाक्यात उपयोग: मी केलेला बेत साफ फसला.

भाषा प्रदुषण टाळता येऊ शकतं मित्रांनो!


मराठी भाषेवर झालेल्या इंग्रजी अतिक्रमणाची जबाबदारी मराठी भाषिकांनी आता उचलायलाच हवी. मराठी बोलत असतांना कळत नकळत आपण एखादा इंग्रजी शब्द वापरतो आणि तसं करणं चुकीचं न मानता त्याच चुकांची पुनरोक्ती करत राहतो. एखादा शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये माहीत आहे पण मराठीत नाही आणि म्हणुन तुम्ही तात्पुरता तो शब्द वापरण्यात चुक नाही.  पुढच्या वेळी मला इंग्रजी शब्द वापरायला लागु नये अशी एक चुटपुट मात्र मनाला लागायला हवी. अशा शब्दांचं प्रमाण म्हटलं तर खुपच कमी असतं. थोडी सजगता बाळगुन आपण मराठीवर होत चाललेलं इंग्रजी शब्दांचं हे अतिक्रमण टाळू शकतो. आणि थोडे प्रयत्न केले तर झालेलं अतिक्रमण परतवुन सुद्धा लावु शकतो.

उदाहरणार्थ problem हा इंग्रजी शब्द मराठी साठी चांगलाच problem होऊन बसलाय. या शब्दाशिवाय कोणत्याही मराठी माणसाचा दिवस  जाऊ शकत नाही. असे इतरही बरेच शब्द असतील पण हा शब्द यासाठी वेगळा आहे कि ह्या एकटया पठ्ठयाने मराठीतील डझनभर शब्दांना सळो कि पळो करून सोडलंय. उठता बसता या शब्दाचा वापर लोक अत्यंत सराईतपणे करत असतात. हि आहेत काही उदाहरणं:


  • अरे यार एक problem आहे                                [अडचण]
  • हा गणिताचा problem तुला सुटला का?               [प्रश्न]
  • मला काहीच  problem नाही                               [ माझी काहीच हरकत नाही ]
  • एक मोठ्ठा problem झालाय                                [घोटाळा] 
  • हा problem कसा सोडवावा कळत नाही             [तिढा\गुंता] 
  • काय गं, काही problem आहे का?                      [त्रास] 
  • तु नेहमी असा problem करून ठेवतोस       [गोंधळ] 
  • वाढती जनसंख्या हा एक राष्ट्रीय problem आहे [समस्या] 



बघितलत, हा बहुरूपी शब्द चटकन अर्थ बदलुन कुठेही घुसतो. आणि तो घुसु शकतो कारण निव्वळ सोयीचं म्हणुन आपण विचार न करता त्याचा वापर करत सुटतो. बरं असही नाही कि इंग्रजीत या सगळ्या मराठी शब्दांसाठी पर्यायी शब्द नाही. पण इंग्रजी मुळातच आपली भाषा नसल्यामुळे शब्द भांडार मर्यादित असतं आणि योग्य तो मराठी शब्द वापरत बसण्याची तसदी आपल्याला घ्यायची नसते. या सगळ्या गोंधळातून जन्माला येते एक संकरित आणि प्रदुषित मिश्र बोली भाषा.  अशा जवळपास शंभराहून अधिक शब्दांनी सध्या मराठी भाषेत धुमाकुळ घातलाय. मराठी माध्यमांनी पण जबाबदारीची जाणीव न ठेवता या प्रकाराला खतपाणी घातलेलं आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये ही  प्रदुषित मिश्र बोली भाषा तुम्हाला सर्रास बघायला मिळते.  असं करत असतांना अनभिज्ञपणे आपण हेच सिद्ध करत असतो कि संवाद साधण्यासाठी माझी भाषा स्वयंपुर्ण नसल्यामुळे मला दुसऱ्या भाषेच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो.  हा आपणच आपल्या भाषेचा केलेला अनादर आहे.

मित्रांनो प्रत्येक भाषा सुंदर असते.  भाषेचा आपला एक बाज असतो एक शैली असते. प्रत्येकाचं आपल्या मातृभाषेवर प्रेम असतं. व्यक्ती, वेळ, ठिकाण बघून  तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही संवादासाठी निवडावी. पण दुसऱ्या भाषेतील शब्दांची ठिगळं लावुन कोणत्याही भाषेला विद्रुप करणं याला काहीच स्पष्टीकरण असु शकत नाही.  मग थोडी खबरदारी घेऊन, थोडी तसदी घेऊन आपण आपल्या, आणि इतरही, भाषांचं निखालसपण अबाधित राखणे हि आपली जबाबदारी नाही का? भाषेने तुमच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यास तुमची मदत केली. तुम्हाला हवं ते मिळवुन देण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या तुमची मदत केली. म्हणुन भाषेवर तुमचं प्रेम असेल तर तो तिचा अधिकार आहे. ते प्रेम, तो आदर तुमच्या लिहिण्यातुन, बोलण्यातुन, वागण्यातुन  जगाला दिसु दया.  काय, कराल ना मग एवढं?


पसायदान


पसायदान हे संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या महान यज्ञाची म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या रचनेची सांगता करण्यासाठी वापरलेलं तुळशी पत्र आहे. या तुळशी पत्राचं महत्व आपण जाणुन  घ्यायला हवं.  'पसाय' म्हणजे प्रसाद, हा प्रसाद कोणता आणि हे दान त्यांनी कोणाकडे मागितले होते?


आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥


विश्वात व्यापुन राहिलेल्या सर्वव्यापी परमेश्वराकडे संत ज्ञानेश्वरांनी हे दान मागितले आहे. हे ईश्वरा, मी चालवलेला हा वाग्यज्ञ आता संपुष्टात आलेला आहे तरी यज्ञ पुर्तीला येण्याची कृपा करून मला प्रसादाचे दान दयावे.
कोणता प्रसाद मागितला संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे?


जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥


जे खल म्हणजे दुष्ट, वाममार्गी लोक आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे वाईट प्रवृत्ती गळुन पडो.  सत्कर्मामध्ये त्यांची रुची वाढो. आणि सर्व प्राणीमात्र हे परस्परांशी मित्रत्वाच्या नात्याने नांदत राहो.


दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

जे ज्ञानापासुन दुर आहेत किंवा दुरावलेले आहेत त्यांचा अज्ञानरूपी अंधकार दुर होऊन या जगावर स्वधर्म सुर्य प्रकाशित होवो. निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला आपापला एक धर्म, स्वभाव, सहज वृत्ती प्रदान केलेली असते. पण आत्म ज्ञानाच्या अभावी प्राणी आपला धर्म सोडुन भरकटायला लागतो तेंव्हा जगात वाईट प्रवृत्तींचा उदय होऊन कोणाचेही जीवन आनंदी राहु शकत नाही.  मनुष्य प्राणी जेंव्हा हा स्वधर्म (माणुसकी) ओळखुन त्याचे पालन करेल तेंव्हा या जगात सगळीकडे सुख, समाधान नांदायला लागेल. ज्ञानेश्वरांनी मागितले कि हा स्वधर्माचा सुर्य लवकरात लवकर जगावर उदयास यावा वं तो तसाच तळपत रहावा.

ज्याला जे हवं असेल ते त्याला मिळो. हे मागणं खरंच पुर्ण होण्यासारखं आहे का? वरवर पाहता नाही पण या आधी ज्ञानेश्वरांनी काय मागितले हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी मागितलं आहे कि प्रत्येकाला आपल्या स्वधर्माचे भान येवो. जर हे मागणं पुर्ण झालं तर पुढील मागणं हे त्याचाच परिपाक ठरेल. मनुष्य धर्माचे पालन करतांना  सगळे जेंव्हा सर्वेपि सुखिनः सन्तु, सगळ्यांच्या मंगलाची कामना करायला लागतील तेंव्हा सगळं जग आनंदी होणार. सगळीकडे समाधान, शांती नांदु लागेल.


वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥


सगळीकडे मांगल्याचा वर्षाव होवो. तुझ्या भक्तांची, तुझ्यावर निष्ठा असणाऱ्या लोकांची सगळीकडे भरमार असु दे. सतत ज्यांच्या सानिध्यात राहुन, या भूतलावर तुझ्या अस्तित्वाची प्रचीती लोकांना येत राहु दे.


चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥


जे कल्पतरूंचे जणु चालते बोलते उद्यान आहे,  सर्व चिंतांचे हरण करणारे रत्न म्हणजे चिंतामणी, ते रत्न अचेतन असतं आणि ज्याला प्राप्त झालं त्याचीच फक्त चिंता दुर होणार, इथे चेतन, जिवंत रत्नांचे गावच आहे, आणि ज्यांच्या वाणीतुन निघणारे शब्द, वचने म्हणजे जणु  अमृतरूपी समुद्र.


चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

जे निष्कलंक चंद्रासारखे आणि ताप रहित सूर्यासारखे आहेत, असे ते ईश्वरनिष्ठ लोक  सदा सर्वांचे सज्जन आप्त स्वकीय होऊन राहोत.


किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥


आणखी काय सांगावे, तिन्ही लोकातील सर्व सुखांनी तृप्त होऊनही जो सतत आदि पुरुषाला भजत आला आहे.


आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

आणि या मृत्यूलोकात विशेष करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्यांचे जीवनात सार होऊन राहिला आहे, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजय मिळवता यावा अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.


येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

ज्ञानेश्वरांचे हे आर्जवी मागणे ऐकुन त्यांचे गुरु आणि थोरले बंधु निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानिया तुला ह्या प्रसादाचे दान मिळणार. तथास्तु!

हा वर मिळताच ज्ञानेश्वरांना परमानंद झाला. लोकांच्या हितासाठी त्यांनी चालविलेला हा यज्ञ शेवटी एकदा फळाला आला.

                                                   
   

बुधवार, १५ मार्च, २०१७

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

म्हणी आणि वाक्प्रचार वापरून आपण आपले विचार प्रभावी पणे मांडु शकतो, अर्थात समोरच्याला सुद्धा त्यांचे अर्थ माहित असतील तर. त्यामुळे ह्या म्हणींचा अभ्यास करून जाणीवपूर्वक वापर करायाला शिका मित्रांनो.

एखाद्या म्हणीचा अर्थ किंवा संदर्भ हवा असल्यास टिप्पणी टाका.

आतापर्यंत आपण खालील म्हणी शिकलो:
-------------------------------------------------

झाकली मूठ सव्वा लाखाची

अर्थ:   आपले ज्ञान किंवा संपत्ती याबद्दल फार वाच्यता न केल्यास लोक आपल्याकडे संभावित श्रीमंत किंवा ज्ञानी म्हणून बघतात. म्हणून  फार बोलून आपली वस्तुस्थिती उघड करून घेऊ नये.

🌼


नावडतीचे मीठ अळणी

अर्थ:   ह्या म्हणीचा शाब्दिक अर्थ हा सासु आणि सुन  ह्या नात्यावर योजिलेला आहे. नावडत्या सुनेने कितीही चांगले काम केले तरी सासु त्यात खोट काढणारच. लाक्षणिक अर्थात, आपल्याला आवडत नसलेल्या व्यक्तीचे चांगले काम देखील आपल्याला सहज मान्य होत नाही वं त्यामुळे आपण त्यात काही ना काही दोष शोधण्याचा प्रयत्न करतो.
🌼



कानामागून आली आणि तिखट झाली

अर्थ:  एखाद्याने नंतर येऊन आणि कमी अनुभव असुनही वरचढ कामगिरी करून पुढे निघून जाणे.

ह्या म्हणीचा शाब्दिक अर्थ हा सासू आणि सून  ह्या नात्यावर योजिलेला आहे. सून घरात आल्यानंतर ज्याप्रमाणे हळुहळु आपली चुणूक दाखवत कारभार आपल्या हातात घेते आणि सासुला वरचढ होऊन बसते.  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा नंतर येऊन आणि कमी अनुभवी असुनही आपल्यापेक्षा वरचढ कामगिरी करून पुढे निघून जाते.
🌼



घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे

अर्थ:   आपलीच बरीच कामे पडली असतांना दुसऱ्याने काम सांगणे या परिस्थितीत हि म्हण वापरतात.

शाब्दिक अर्थात, कुटुंबाचे पोट भरायचे वांदे असतांना व्याह्याने भेट म्हणुन पाठवलेला घोडा हि एक आफत होऊन बसते कारण आता त्याच्या चारापाण्याची पण व्यवस्था लावावी लागणार.
🌼



गावचा राजा गावात बळी, परगावी गाढवे वळी 

अर्थ:   जिथे आपला अधिकार चालतो तिथेच आपली मर्जी चालते किंवा बडेजाव चालतो. इतर ठिकाणी आपल्याला कोणी विचारत देखील नाही.

याचं एक उदाहरण म्हणजे गावाहुन शहरात कामाला आलेला माणुस इकडे हमाली का करेना पण जेंव्हा गावी जातो तेंव्हा मात्र साहेबाची मिजास आणतो आणि लोकसुद्धा त्याच्याकडे आदराने बघतात.
🌼



असेल तेंव्हा दिवाळी नसेल तेंव्हा शिमगा

अर्थ:   जवळ पैसा असतांना मागचा पुढचा विचार न करता तो पैसा चैनीत उधळायचा आणि मग पैसा संपला कि हाल अपेष्टा सहन करत बसावयाचे अशा वर्तनास हि म्हण वापरतात.
🌼



उंदराला मांजर साक्ष

अर्थ:   भोळ्या मनुष्यास फसविण्यासाठी लुच्चा माणुस काही काळ त्याच्या मर्जीप्रमाणे वागुन विश्वास संपादन करतो म्हणजे मग आपले काम काढुन घेण्यास सोपे जाते. परंतु आपल्या संकटसमयी शत्रूचे सहाय्य घेणे हे परिणामी नाशाचे कारण ठरू शकते.
🌼



अति रागा भीक मागा

अर्थ:   ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.
🌼



दे रे हरी पलंगावरी

अर्थ:   काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.
🌼



आंधणातले रडतात आणि सुपातले हसतात

अर्थ: तांदुळ जेंव्हा सुपात पाखडले जातात तेंव्हा आनंदाने उड्या मारतात पण मग तेच जेंव्हा शिजायला आंधणात जातात तेंव्हा रडतात. तसेच मनुष्याचा आयुष्यात स्थित्यंतरे येत असतात. जी आज सुखात आहे त्यांना उद्या दु:खाची स्थिती येणे हे सृष्टी नियमाला अनुसरून आहे.
🌼



अचाट खाणे अन मसणात जाणे

अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
🌼



शिंक्याचे तुटले बोक्याचे पिकले

अर्थ: कोण्या माणसाची वस्तु\जिन्नस त्याला भोगायला न मिळता अकल्पितपणे काही श्रम न करता दुसऱ्याला भोगायला मिळणे.
🌼



कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे

अर्थ: पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
🌼



नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे

अर्थ: सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे.
अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.
🌼



गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता

अर्थ: मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.

🌼



पाटलाचं घोडं महाराला भूषण

ज्याची वस्तू आहे त्याच्यापेक्षा इतरांनाच त्या वस्तूचे कौतुक वाटणे या अर्थाने ही म्हण वापरली जाते. पुर्वीच्या काळी पाटलाकडे वेगवेगळ्या कामांंसाठी नोकरगडी असायचे. त्यातच प्राणी सांभाळायला, फिरवायला महार लोक असायचे. तर पाटलापेक्षा त्या घोड्याचे कौतुक महारालाच जास्त अश्या लौकिकार्थाने हि म्हण वापरली जाते.
🌼



राजा उदार झाला आणि भोपळा काढून दिला

अर्थ: खूप मदत करतो आहे असा आव आणून अगदी क्षुल्लक किंवा काहीही मदत न करणे.

खरे तर एखादा राजा जेव्हां उदार होऊन बक्षीस देतो तेव्हां तो अंगावरील एखादे आभूषण किंवा भरपुर सोन्याच्या मोहरा वगैरे देतो असे आपण कथा कहाण्यामधून ऐकले आहे पण जेव्हां एखादा राजा खुश होऊन भोपळा भेट देतो, ज्याला काहीच किंमत नसते, अशा प्रसंगावर बेतलेली ही म्हण आहे.
🌼



म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो

अर्थ: एका घटनेने झालेल्या दोन तोट्यांविषयी बोलतांना ही म्हण वापरतात. ज्यातील दुसरा तोटा किंवा नुकसान हे इतके मोठे असते की त्यापुढे पहिल्याचं काहीच वाटत नाही.
नुसतीच म्हातारी मेली असती तर त्याचे फार दु:ख झाले असते. पण आता काळ सोकावतोय(एखाद्या गोष्टीची चटक लागणे) म्हटल्यावर आपल्या जीवावर बेतायची पाळी आली आहे. 
🌼



तळे राखी तो पाणी चाखी 

अर्थ: जो माणूस एखाद्या गोष्टीची जबाबदारी पत्त्करतो तो त्यापासून स्वत:चा फायदा करून घेणारच

उदाहरणार्थ: शेतात आपण पिकाची नासाडी टाळण्यासाठी जो सोकारी(राखणदार) ठेवतो. त्या सोकाऱ्याने स्वत:साठी शेतातले पीक-पाणी वापरणे.
🌼