मराठी भाषेवर झालेल्या इंग्रजी अतिक्रमणाची जबाबदारी मराठी भाषिकांनी आता उचलायलाच हवी. मराठी बोलत असतांना कळत नकळत आपण एखादा इंग्रजी शब्द वापरतो आणि तसं करणं चुकीचं न मानता त्याच चुकांची पुनरोक्ती करत राहतो. एखादा शब्द तुम्हाला इंग्रजीमध्ये माहीत आहे पण मराठीत नाही आणि म्हणुन तुम्ही तात्पुरता तो शब्द वापरण्यात चुक नाही. पुढच्या वेळी मला इंग्रजी शब्द वापरायला लागु नये अशी एक चुटपुट मात्र मनाला लागायला हवी. अशा शब्दांचं प्रमाण म्हटलं तर खुपच कमी असतं. थोडी सजगता बाळगुन आपण मराठीवर होत चाललेलं इंग्रजी शब्दांचं हे अतिक्रमण टाळू शकतो. आणि थोडे प्रयत्न केले तर झालेलं अतिक्रमण परतवुन सुद्धा लावु शकतो.
उदाहरणार्थ problem हा इंग्रजी शब्द मराठी साठी चांगलाच problem होऊन बसलाय. या शब्दाशिवाय कोणत्याही मराठी माणसाचा दिवस जाऊ शकत नाही. असे इतरही बरेच शब्द असतील पण हा शब्द यासाठी वेगळा आहे कि ह्या एकटया पठ्ठयाने मराठीतील डझनभर शब्दांना सळो कि पळो करून सोडलंय. उठता बसता या शब्दाचा वापर लोक अत्यंत सराईतपणे करत असतात. हि आहेत काही उदाहरणं:
- अरे यार एक problem आहे [अडचण]
- हा गणिताचा problem तुला सुटला का? [प्रश्न]
- मला काहीच problem नाही [ माझी काहीच हरकत नाही ]
- एक मोठ्ठा problem झालाय [घोटाळा]
- हा problem कसा सोडवावा कळत नाही [तिढा\गुंता]
- काय गं, काही problem आहे का? [त्रास]
- तु नेहमी असा problem करून ठेवतोस [गोंधळ]
- वाढती जनसंख्या हा एक राष्ट्रीय problem आहे [समस्या]
बघितलत, हा बहुरूपी शब्द चटकन अर्थ बदलुन कुठेही घुसतो. आणि तो घुसु शकतो कारण निव्वळ सोयीचं म्हणुन आपण विचार न करता त्याचा वापर करत सुटतो. बरं असही नाही कि इंग्रजीत या सगळ्या मराठी शब्दांसाठी पर्यायी शब्द नाही. पण इंग्रजी मुळातच आपली भाषा नसल्यामुळे शब्द भांडार मर्यादित असतं आणि योग्य तो मराठी शब्द वापरत बसण्याची तसदी आपल्याला घ्यायची नसते. या सगळ्या गोंधळातून जन्माला येते एक संकरित आणि प्रदुषित मिश्र बोली भाषा. अशा जवळपास शंभराहून अधिक शब्दांनी सध्या मराठी भाषेत धुमाकुळ घातलाय. मराठी माध्यमांनी पण जबाबदारीची जाणीव न ठेवता या प्रकाराला खतपाणी घातलेलं आहे. वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये ही प्रदुषित मिश्र बोली भाषा तुम्हाला सर्रास बघायला मिळते. असं करत असतांना अनभिज्ञपणे आपण हेच सिद्ध करत असतो कि संवाद साधण्यासाठी माझी भाषा स्वयंपुर्ण नसल्यामुळे मला दुसऱ्या भाषेच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. हा आपणच आपल्या भाषेचा केलेला अनादर आहे.
मित्रांनो प्रत्येक भाषा सुंदर असते. भाषेचा आपला एक बाज असतो एक शैली असते. प्रत्येकाचं आपल्या मातृभाषेवर प्रेम असतं. व्यक्ती, वेळ, ठिकाण बघून तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही संवादासाठी निवडावी. पण दुसऱ्या भाषेतील शब्दांची ठिगळं लावुन कोणत्याही भाषेला विद्रुप करणं याला काहीच स्पष्टीकरण असु शकत नाही. मग थोडी खबरदारी घेऊन, थोडी तसदी घेऊन आपण आपल्या, आणि इतरही, भाषांचं निखालसपण अबाधित राखणे हि आपली जबाबदारी नाही का? भाषेने तुमच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यास तुमची मदत केली. तुम्हाला हवं ते मिळवुन देण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या तुमची मदत केली. म्हणुन भाषेवर तुमचं प्रेम असेल तर तो तिचा अधिकार आहे. ते प्रेम, तो आदर तुमच्या लिहिण्यातुन, बोलण्यातुन, वागण्यातुन जगाला दिसु दया. काय, कराल ना मग एवढं?
Sundar
उत्तर द्याहटवा