पसायदान हे संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या महान यज्ञाची म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या रचनेची सांगता करण्यासाठी वापरलेलं तुळशी पत्र आहे. या तुळशी पत्राचं महत्व आपण जाणुन घ्यायला हवं. 'पसाय' म्हणजे प्रसाद, हा प्रसाद कोणता आणि हे दान त्यांनी कोणाकडे मागितले होते?
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
विश्वात व्यापुन राहिलेल्या सर्वव्यापी परमेश्वराकडे संत ज्ञानेश्वरांनी हे दान मागितले आहे. हे ईश्वरा, मी चालवलेला हा वाग्यज्ञ आता संपुष्टात आलेला आहे तरी यज्ञ पुर्तीला येण्याची कृपा करून मला प्रसादाचे दान दयावे.
कोणता प्रसाद मागितला संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे?
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
जे खल म्हणजे दुष्ट, वाममार्गी लोक आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे वाईट प्रवृत्ती गळुन पडो. सत्कर्मामध्ये त्यांची रुची वाढो. आणि सर्व प्राणीमात्र हे परस्परांशी मित्रत्वाच्या नात्याने नांदत राहो.
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
जे ज्ञानापासुन दुर आहेत किंवा दुरावलेले आहेत त्यांचा अज्ञानरूपी अंधकार दुर होऊन या जगावर स्वधर्म सुर्य प्रकाशित होवो. निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला आपापला एक धर्म, स्वभाव, सहज वृत्ती प्रदान केलेली असते. पण आत्म ज्ञानाच्या अभावी प्राणी आपला धर्म सोडुन भरकटायला लागतो तेंव्हा जगात वाईट प्रवृत्तींचा उदय होऊन कोणाचेही जीवन आनंदी राहु शकत नाही. मनुष्य प्राणी जेंव्हा हा स्वधर्म (माणुसकी) ओळखुन त्याचे पालन करेल तेंव्हा या जगात सगळीकडे सुख, समाधान नांदायला लागेल. ज्ञानेश्वरांनी मागितले कि हा स्वधर्माचा सुर्य लवकरात लवकर जगावर उदयास यावा वं तो तसाच तळपत रहावा.
ज्याला जे हवं असेल ते त्याला मिळो. हे मागणं खरंच पुर्ण होण्यासारखं आहे का? वरवर पाहता नाही पण या आधी ज्ञानेश्वरांनी काय मागितले हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी मागितलं आहे कि प्रत्येकाला आपल्या स्वधर्माचे भान येवो. जर हे मागणं पुर्ण झालं तर पुढील मागणं हे त्याचाच परिपाक ठरेल. मनुष्य धर्माचे पालन करतांना सगळे जेंव्हा सर्वेपि सुखिनः सन्तु, सगळ्यांच्या मंगलाची कामना करायला लागतील तेंव्हा सगळं जग आनंदी होणार. सगळीकडे समाधान, शांती नांदु लागेल.
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
सगळीकडे मांगल्याचा वर्षाव होवो. तुझ्या भक्तांची, तुझ्यावर निष्ठा असणाऱ्या लोकांची सगळीकडे भरमार असु दे. सतत ज्यांच्या सानिध्यात राहुन, या भूतलावर तुझ्या अस्तित्वाची प्रचीती लोकांना येत राहु दे.
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
जे कल्पतरूंचे जणु चालते बोलते उद्यान आहे, सर्व चिंतांचे हरण करणारे रत्न म्हणजे चिंतामणी, ते रत्न अचेतन असतं आणि ज्याला प्राप्त झालं त्याचीच फक्त चिंता दुर होणार, इथे चेतन, जिवंत रत्नांचे गावच आहे, आणि ज्यांच्या वाणीतुन निघणारे शब्द, वचने म्हणजे जणु अमृतरूपी समुद्र.
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
जे निष्कलंक चंद्रासारखे आणि ताप रहित सूर्यासारखे आहेत, असे ते ईश्वरनिष्ठ लोक सदा सर्वांचे सज्जन आप्त स्वकीय होऊन राहोत.
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणखी काय सांगावे, तिन्ही लोकातील सर्व सुखांनी तृप्त होऊनही जो सतत आदि पुरुषाला भजत आला आहे.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
आणि या मृत्यूलोकात विशेष करून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्यांचे जीवनात सार होऊन राहिला आहे, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजय मिळवता यावा अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
ज्ञानेश्वरांचे हे आर्जवी मागणे ऐकुन त्यांचे गुरु आणि थोरले बंधु निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानिया तुला ह्या प्रसादाचे दान मिळणार. तथास्तु!
हा वर मिळताच ज्ञानेश्वरांना परमानंद झाला. लोकांच्या हितासाठी त्यांनी चालविलेला हा यज्ञ शेवटी एकदा फळाला आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा